*आजपासून दहावीची परीक्षा*

पुणे, दि. २९ – महाराष्ट्र राज्य – माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने इयत्ता दहावीच्या लेखी परीक्षेला शुक्रवार (दि.१) पासून सुरुवात होणार आहे. या परीक्षेसाठी राज्यातील २३ हजार २७२ माध्यमिक शाळांमधील १६ लाख ९ हजार ४४५ विद्यार्थ्यांची नोंदणी झालेली आहे. परीक्षेसाठी ५ हजार ८६ केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. नऊ विभागीय मंडळांमार्फत लेखी परीक्षा १ ते २६ मार्च या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. या परीक्षेसाठी ८ लाख ५९ हजार ४७८ विद्यार्थी तर ७ लाख ४९ हजार १११ विद्यार्थिनी आहेत व ५६ ट्रान्सजेंडर आहेत. विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण कमी होण्याच्या परीक्षेदरम्यान महत्त्वाच्या बहुतांश विषयांच्या पेपरमध्ये खंड ठेवण्यात आला आहे, अशी माहिती राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. यावेळी राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक, सहसचिव माणिक बांगर आदी उपस्थित होते. परीक्षांच्या कालावधीत अनेक विद्यार्थी
नकारात्मक विचाराने किंवा परीक्षेच्या भितीने मानसिक दडपणाखाली असतात अशा विद्यार्थ्यांना नैराश्येतून बाहेर काढण्यास मदत करण्यासाठी राज्य मंडळ स्तरावरून समुपदेशन करण्यासाठी १० समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी व त्यांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी विभागीय स्तरावर मंडळामध्ये जिल्हानिहाय प्रत्येक्की होत साप्रमाणे समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. राज्यमंडळ व ९ विभागीय मंडळात नियंत्रण कक्ष कार्यरत करून हेल्पलाइन सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. सर्व परीक्षार्थ्यांना परीक्षेच्या निर्धारित वेळेपूर्वी किमान अर्धा तास अगोदर परीक्षा केंद्रावर पोहोचण्याच्या सूचना सर्व माध्यमिक शाळांमार्फत परीक्षार्थ्यांना देण्यात आलेल्या आहेत. तसेच परीक्षार्थ्यांना देण्यात आलेल्या प्रवेशपत्रातही
नमूद करण्यात आलेले आहे. सकाळ सत्रात स. १०.३० वाजता व दुपार संत्रात दु. २.३० वाजता परीक्षार्थ्यांनी परीक्षा दालनात उपस्थित राहणे आवश्यक आहे. सकाळ सत्रात स.११.०० वाजता तसेच दुपार सत्रात दु. ३.०० वाजता परीक्षा दालनात प्रश्नपत्रिकांचे वितरण करण्यात येणार आहे. गतवर्षीप्रमाणेच यंदाच्या परीक्षेसाठी पेपरच्या निर्धारित वेळेनंतर शेवटी दहा मिनिटे वाढवून देण्यात आलेली आहेत.