*इयत्ता बारावीची परिक्षा आजपासून*

पुणे, दि. २० : राज्य शिक्षण मंडळातर्फे राज्यातील बारावीची लेखी परीक्षा आजपासून (२१ फेब्रुवारी) सुरू होत आहे. यंदा एकूण १५ लाख १३ हजार ९०९ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. परिक्षेदरम्यान गैरप्रकार टाळण्यासाठी भरारी पथके, प्रश्नपत्रिकेची पाकिटे ताब्यात घेतल्यापासून प्रश्नपत्रिका वितरित करेपर्यंतचे चित्रिकरण मोबाइलमध्ये करण्यात येणार आहे. तसेच प्रश्नपत्रिकांच्या वाहतुकीवेळी जीपीएस प्रणालीचा वापर करण्यात येणार आहे.बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते २३ मार्च या कालावधीत होत आहे. विज्ञान शाखेसाठी ७ लाख ६० हजार ४६, कला शाखेसाठी ३ लाख ८१ हजार ९८२, वाणिज्य शाखेसाठी ३ लाख २९ हजार ९०५, व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी ३७ हजार २२६, आयटीआयसाठी ४ हजार ७५० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.अशी माहिती राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेत दिली. मंडळाच्या सचिव अनुराधा ओक, माणिक बांगर यावेळी उपस्थित होते. राज्यभरात कॉपीमुक्त अभियान राबवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त, जिव्हा पोलिस अधीक्षक यांना देण्यात आले आहेत. त्यासाठी २७१ भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच जिल्हा स्तरावरही भरारी पथके तयार करण्यात आली आहेत, अशी माहिती गोसावी यांनी दिली.