आरटीई अंतर्गत ८१ हजार बालकांचे प्रवेश निश्चित

आतापर्यंतच्या प्रवेशफेऱ्यानंतर राज्यात २१ हजार जागा रिक्त

पुणे : शिक्षणाचा हक्क कायदा (आरटीई) अंतर्गत खासगी शाळांमध्ये मोफत शिक्षणासाठी प्रवेश दिला जातो. प्रतीक्षा यादीतील दुसऱ्या फेरीसाठी राज्यातील ८ हजार ८२६ विद्यार्थ्यांची निवड केली होती, त्यापैकी ३ हजार २१५ विद्यार्थ्याचे प्रवेश निश्चित झाले आहेत. यंदा एकूण १ लाख १ हजार ८४६ रिक्त जागांपैकी आतापर्यंत झालेल्या प्रवेश फेऱ्यांमधून ८० हजार ९४५ जागांवर प्रवेश निश्चित झाले आहेत. तसेच २० हजार ९०१ जागा रिक्त राहिल्या आहेत. राज्यभरातून प्रवेशासाठी ३ लाख ६४ हजार अर्ज दाखल आरटीई अंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि समाजातील वंचित घटकांतील विद्यार्थ्यांना खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये २५ टक्के जागांवर प्रवेश देण्यात येतात. राज्यात या वर्षी ८ हजार ८२३ खासगी शाळांमध्ये १ लाख १ हजार ८४६ जागा रिक्त होत्या. त्यासाठी प्रवेश प्रक्रिया करण्यात आली होती.
आरटीईअंतर्गत या जागांवर मोफत शिक्षण घेण्यासाठी मुलांना प्रवेश मिळावा यासाठी यंदा ३ लाख ६४ हजार ४१३ अर्ज प्राप्त झाले होते. एप्रिल महिन्यात लॉटरीच्या माध्यमातून नियमित प्रवेश फेरीसाठी ९४ हजार ७०० विद्यार्थ्यांची निवड केली होती. प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना वेळोवेळी मुदतवाढ देण्यात आली. त्यानंतरही केवळ ६४ हजार ४० विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले होते. त्यानंतर प्रतीक्षा यादीच्या पहिल्या फेरीत प्रवेशासाठी निवड केलेल्या २५ हजार ८९८ विद्यार्थ्यांपैकी जवळपास निम्मे म्हणजे १३ हजार ६९० प्रवेश निश्चित झाले. प्रतीक्षा यादीतील दुसऱ्या फेरीमध्ये ८ हजार ८२७ जणांची निवड होती.

पुणे जिल्ह्यांत १३ हजार ७७२ जागांवर प्रवेश

■  पुणे जिल्ह्यांत आरटीई अंतर्गत प्रवेशासाठी ९३५ खासगी शाळांमध्ये १५ हजार ५९६ जागा रिक्त होत्या. त्यासाठी ७७ हजार ५३१ अर्ज प्राप्त झाले होते. लॉटरीच्या माध्यमातून नियमित प्रवेश फेरीसाठी निवड केलेल्या १५ हजार ५०१ विद्याथ्यांपैकी १० हजार ६९६ प्रवेश निश्चित झाले.

■  त्यानंतर पहिल्या प्रतीक्षा यादीत ४ हजार ४९४ विद्यार्थ्यांपैकी २ हजार ४१४ तसेच तिसया प्रतीक्षा यादीत १,६२७ पैकी ६६२ विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले. ७ जुलैपर्यंत एकूण १३ हजार ७७२ जागांवर प्रवेश निश्चित झाले असून, १ हजार ८२४ जागा रिक्त आहेत.

 

प्रवेश फेरी                    निवड                     प्रवेश निश्चित
नियमित प्रवेश फेरी         ९४ हजार ७००          ६४ हजार ०४०
पहिली प्रतीक्षा यादी        २५ हजार ८९८          १३ हजार ६९०
दुसरी प्रतीक्षा यादी         ८ हजार ८२७            ३ हजार २१५