९० मीटर अंतर गाठण्याचे दडपण नाही

नवी दिल्ली ऑगस्ट महिन्यात : होणारी जागतिक अजिंक्यपद स्पर्धा अत्यंत महत्त्वाची असून त्यासाठी शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्ती राखण्यावर पूर्ण लक्ष लागले आहे. तसेच, ९० मीटर अंतर गाठण्याचे कोणतेही दडपण माझ्यावर नाही, असे भारताचा ऑलिम्पिक सुवर्ण विजेता भालाफेकपटू नीरज चोप्रा याने सांगितले. मांसपेशी ताणल्या गेल्याने तीन आघाडीच्या स्पर्धांमध्ये नीरजने सहभाग घेतला नव्हता.

काही दिवसांपूर्वीच झालेल्या लुसाने डायमंड लीगमध्ये नीरजने जबरदस्त पुनरागमन करत सुवर्ण पदकावर कब्जा केला. त्याने गेल्या आठवड्यात ८७.६६ मीटरची फेक करत अव्वल स्थान पटकावले. भारतीय क्रीडा प्राधिकरणद्वारे (साड़) झालेल्या ऑनलाइन परिषदेत नीरजने म्हटले की, ‘दोहाच्या तुलनेत लुसाने येथील स्पर्धा शारीरिक आणि मानसिकरीत्या आव्हानात्मक ठरली. कारण, मध्यंतरी दुखापतग्रस्त राहिल्याने सर्व लक्ष तिथेच होते. सत्रादरम्यान दुखापतग्रस्त केंद्रित होते. यादरम्यान मी तीन स्पर्धामध्ये सहभाग घेतला नाही. या स्पर्धादरम्यान वातावरण चांगले होते आणि मी ९० मीटरचे लक्ष्य गाठू शकलो असतो. पण, या गोष्टीचे कोणतेही दडपण नाही.

नीरज पुढे म्हणाला की, ‘आता आशियाई क्रीडा आणि जागतिक अजिंक्यपद स्पर्धा होणार आहेत. ज्या दिवशी परिस्थिती अनुकूल राहील, तेव्हा ९० मीटरची फेक नक्की होईल. लुसाने येथील वातावरण पाहता कामगिरी चांगली झाली. आतापर्यंत मी जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकलेले नाही, त्यामुळे यंदा ही कमतरता भरून काढण्यासाठी मला पूर्ण मेहनत घ्यायची आहे. दुखापतींपासून दूर राहण्यासाठी आणि तंदुरुस्ती कायम राखण्यासाठी, या स्पर्धेआधीच्या स्पर्धामध्येही विचारपूर्वक सहभागी होईन.’

सर्व आघाडीचे खेळाडू आपल्या अखेरच्या प्रयत्नापर्यंत स्वतःला सज्ज ठेवतात. मी भुवनेश्वर येथे आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत सहाव्या प्रयत्नात सुवर्ण जिंकले होते. मला विश्वास असतो की, सुरुवातीचे प्रयत्न चांगले गेले नाही, तरी अखेरच्या प्रयत्नांमध्ये मी भरपाई करू शकतो.

                                                 – नीरज चोप्रा