आईने दिलेली मनशुद्धीची शिकवण हीच माझ्या जीवनाची प्रेरणा

    सहकाच्यासमवेत प्रार्थना करताना साने गुरुजी.

कोकणात दापोलीजवळच्या (जि. रत्नागिरी) पालगड गावात माझा जन्म झाला. त्या वेळी ब्रिटिशांचं राज्य होतं आणि हे गाव मुंबई प्रांतात होतं. माझे वडील सदाशिवराव हे खोत होते. आई यशोदा गृहिणी होती. तिचा माझ्यावर खूप जीव होता. ती मला लाडाने श्याम म्हणून हाक मारायची. लहानपणी मी सारखा आजारी पडायचो तेव्हा आई माझ्या उशाशी रात्रभर बसून राहायची. पण तिने माझ्यावर जे संस्कार केले ते आयुष्यभर माझ्या स्मरणात राहिले. त्यावर मी ‘श्यामची आई’ हे पुस्तक लिहिलं. घरातल्या साध्या-साध्या गोष्टींबाबत ती आग्रह धरायची. स्वच्छता, खरे बोलणे आणि अभ्यास या गोष्टींवर तिचा भर असे.

तो प्रसंग सर्वश्रुत असला तरी सांगितलाच पाहिजे. आमच्या घराबाहेर अंगण होतं. त्या अंगणातल्या एका मोठ्या दगडावर आई रोज सकाळी मला अंघोळ घालायची. माझी अंघोळ झाल्यावर मी आईला म्हणालो, “माझी पावलं ओली आहेत. मी असाच दगडावरून उतरलो तर पायाला माती लागेल.” आईने लगेच तिचा पदर खाली पसरला. मी त्याच्यावर पावलं ठेवली आणि ती कोरडी करून घरात शिरलो. त्यावर आईने दिलेली शिकवण मला जीवनभर पुरली. ती म्हणाली, “पावलांना माती लागू नये म्हणून जशी काळजी घेतोस, तशीच काळजी मनाला घाण लागू नये म्हणूनही काळजी घे.” ही काळजी मी आयुष्यभर घेतली.

माझ्याच मनाला नव्हे तर समाजाच्या मनालाही घाण लागू नये, याचीही काळजी मी घेतली. जे जे लोक माझ्या संपर्कात आले, त्यांच्या मनातलं वाईट, चुकीचं खोडून काढण्याचा प्रयत्न केला. शेतकरी, कष्टकरी, सामान्य नागरिक यांचं राज्य यावं यासाठी स्वातंत्र्यसैनिक जिवाचं रान करत होते. गांधीजींच्या प्रेरणेनं मीही त्यात सहभागी झालो. माझ्या परीने योगदान देण्याचा प्रयत्न केला. पुस्तकं आणि साहित्य हा मन परिवर्तनाचा राजमार्ग. हे ओळखून मी ‘साधना’ साप्ताहिक सुरू केलं, पुस्तकं लिहिली. त्याला लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला. आईने माझ्या बालमनावर जसे संस्कार केले तसे संस्कार मीही माझ्या विद्यार्थ्यांच्या मनात रुजवले. पण या सगळ्यामागे मन शुद्ध ठेवण्याची आईने दिलेली प्रेरणा होती. त्याच प्रेरणेतून तर श्यामचा ‘साने गुरुजी’ होऊ शकला.