समृद्धी अपघातातील २४ मृतांच्या पार्थिवावर सामूहिक अंत्यसंस्कार

बुलढाणा समृद्धी महामार्गादर शनिवारी खासगी प्रवासी बसला झालेल्या अपघातामधील २४ मृतांच्या पार्थिवावर स्थानिक संगम तलाबस्थित स्मशानभूमीत सामूहिक संस्कार करण्यात आले. यावेळी मृतांच्या नातेवाइकांनी एकच आक्रोश केला स्मशानभूमीत बुलढाण्यासह आजूबाजूच्या खेड्यातील नागरिकांनी गर्दी केली.

 

♦ नातेवाइकांचा आक्रोश, प्रशासनाची धावपळ, गिरीश महाजन यांनी दिला अग्नी

बुलढाणा : समृद्धी महामार्गावर १ जुलैला झालेल्या खासगी बस अपघातामधील २४ मृतांच्या पार्थिवावर स्थानिक संगम तलाव स्थित स्मशानभूमीत सामूहिक अंत्यसंस्कार करण्यात आले, तर नागपुरातील झोया शेख यांचे पार्थिव बुलढाण्यातील कब्रस्तानमध्ये दफन करण्यात आले. दुपारी साडेबाराच्या सुमारास ग्रामविकास तथा वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी पार्थिवांना अग्नी दिला.

♦ ओळख पटविणे अवघड, नातेवाइकांचे समुपदेशन

मृतांची ओळख पटविणे अवघड असल्याने तथा दीर्घकाळ ते शवपेटीतही ठेवता येण्यासारखे नसल्याने नातेवाइकांचे समुपदेशन करत तथा त्यांची सहमती घेत सामूहिक अंत्यसंस्कार करण्यात आले.

♦ २० चितांवर २४ पार्थिवांचे दहन

बुलढाणा पालिकेकडून स्मशानभूमीमध्ये साडेसात विचटल लाकूड, अडीच हजार गोवऱ्यांसह धार्मिक विधीसह अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रसंगी खा. प्रतापराव जाधव, खा. रामदास तडस, आमदार आकाश फुंडकर, श्वेता महाले, संजय गायकवाड, माजी आमदार विजयराज शिंदे, आ. पंकज भोयर, जिल्हाधिकारी डॉ. एच. पी. तुम्मोड, जि. प. सीईओ भाग्यश्री विसपुते, जिल्हा पोलिस अधीक्षक सुनील कडासने आदी उपस्थित होते.