कुटूंबातील प्रत्येक व्यक्तीच्या नावाने फळझाड

पार्डी : अर्धापूर तालुक्यातील खैरगाव येथील शिंदे कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीच्या नावाने शेतामध्ये विविध फळांचे झाडे लावण्यात आली आहेत. ही परंपरा आजोबांच्या काळापासून चालत आलेली असल्याची माहितीही तरुण शेतकरी अविनाश शिंदे यांनी दिली.

अर्धापूर तालुक्यातील खैरगाव येथील शेतकरी अविनाश शिंदे यांचे शिक्षण एम.ए., एम.फील झाले आहे. नोकरीच्या शोधात न राहता त्यांनी वडिलोपार्जित 30 एकर शेतीमध्येच विविध उपक्रम राबवून भरपाई उत्पन्न काढत आहेत.

यामध्ये त्यांना दोन भावांची सुद्धा चांगली मदत आहे. तसेच शेतीमध्ये मजूर न लावता घरातील सर्व मंडळी शेतीमधील कामे पूर्ण करतात. आजोबांनी याच शेतामध्ये दोन मुलांच्या नावाने झाडे लावली होती. तिसऱ्या पिढीनीही ती संकल्पना जोपासली आहे. अविनाश शिंदे यांच्या वडिलांनी तीन मुलांच्या व दोन मुलींच्या नावाने आंबा व नारळ या फळांची झाडे लावली. तर त्यांच्या मुलांनी आपल्या पत्नीच्या नावाने झाडे लावली. यातमध्ये सीताफळ व रामफळांची झाडे आहेत.

अविनाश आणि त्यांच्या दोन भावांच्या मुलांच्या नावाने त्यांनी फणस व चिकूच्या झाडे लावली आहे. आतापर्यंत दोनशेहून अधिक विविध फळांची झाडे शेतामध्ये आहेत. वेगवेगळ्या ऋतूमध्ये फळे खाण्यास मिळतात.

मरण पावलेल्या कुत्र्याच्या नावाने सुद्धा लावले जांभळाचे झाड

♦ अविनाश शिंदे यांनी भांची व भाच्याच्या नावाने सुद्धा शेतामध्ये फळांचे झाड लावले आहेत. फळांच्या वेळी खास करून भांची व भाच्याच्या फळा खाण्यासाठी येतात, तसेच त्यांच्या गावामध्ये अभिमानाने सांगतात की आमच्या मामाने आमच्या नावाने आंब्याची व चिकूची झाडे लावली आहेत.

♦ घरातील पाळीव प्राणी कुत्रा होता. काही कारणाने तो मरण पावला. त्यांच्या सुद्धा नावाने जांभूळ यांचे झाड लावले आहे. त्यांच्या घरामध्ये ३० सदस्य प्रत्येकांच्या नावाने झाडे लावली आहेत, असे २००हून अधिक विविध प्रकारांचे फळांचे झाडे लावले.