तेवीसाव्या वर्षी शेतकर्‍याच्या लेकीचे घवघवीत यश; ‘एलआयसी’ परीक्षेत आरती गवारे राज्यात मुलींमध्ये दुसरी

खेड तालुक्यातील मोई येथील शेतकरी कुटुंबातील आरती गवारे हिने घरच्या आर्थिक परिस्थितीवर मात करत आयुर्विमा महामंडळाच्या (एलआयसी ) विकास अधिकारी परीक्षेत मुलींमध्ये महाराष्ट्रात दूसरी येत घवघवीत यश संपादन केलं आहे. तेवीसाव्या वर्षी लेकीनं मिळवलेल्या यशाने वडिल संतोष आणि आई उषा गवारे यांना आकाश ठेंगणं झालं आहे. आरती सध्या तळवडे (Pimpri ) येथील आयटी कंपनीमध्ये नोकरी करते. तिने फक्त परीक्षाच पास केली नाही तर राज्यात ‘एलआयसी विकास अधिकारी’ म्हणून नववा क्रमांक पटकवला आहे. आरतीचं हे यश अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. एलआयसी मार्फत एलआयसी विकास अधिकारी पदासाठी घेण्यात आलेल्या 2023 च्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. यात आरतीने राज्यात नववा तर मुलींमध्ये दूसरा क्रमांक पटकावला आहे. आरतीच्या या यशाबद्दल तिचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

खेड तालुक्यातील मोई हे आरतीचं गाव. तालुक्याच्या शिवाजी विद्यालयात आरती शिक्षण घ्यायची. अकरावी-बारावीचे शिक्षण निगडी येथील कॅम्प एज्युकेशन येथून झाले तर बीकॉम तीने मॉडर्न कॉलेज मधून केले. गावामध्ये येण्याजाण्यासाठी व्यवस्थित रस्ता नसल्यामुळे ती पिंपरी चिंचवड मध्ये मामा कडे राहत शिक्षण घेत होती. घरची परस्थिती प्रतिकूल होती.  मात्र परिस्थितीवर मात करत आरतीनं घवघवीत यश मिळवलं.

माझ्या आई वडिलांचं मी अधिकारी व्हावं असं स्वप्न होतं. ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी कसलिही अडचण येऊ दिली नाही. त्याचबरोबर अनेक स्पर्धा परीक्षेचा अभ्यास अत्यंत सोप्या पध्दतीने करण्यासाठी निगडी येथील ओझर्डे’ज रॅडिकल इंस्टीट्यूटचे प्रा.भूषण ओझर्डे यांचे अत्यंत मोलाचे मार्गदर्शन लाभले असल्याचं आरती गवारे हिनं सांगितलं.

संतोष गवारे यांनी मुलीच्या यशाबद्दल बोलताना तिचं कौतुक केलं. तिला हे मिळालेल यश ही आनंदाची गोष्ट आहे. मुला मुलींना शिक्षण देणं हे आमचं कर्तव्य आहे. आरती आता तळवडे येथे आयटी कंपनी मध्ये नोकरी करत असून सुट्टीच्या दिवशी गावी येऊन घरच्या कामात मदत करते, असं संतोष गवारे म्हणाले.. ‘लेकरं शिकली, तर सगळं सार्थक होईल,’ या एकाच वाक्यातून संतोष गवारे यांची मुलांच्या शिक्षणांबद्दल आस्था लक्षात येते.