पालखी सोहळा प्रस्थानानंतर तीन तासांत बारामती ‘क्लीन’

चकाचक बारामती शहर ठरला नागरिकांच्या कौतुकाचा विषय

लोकमत न्यूज नेटवर्क बारामती : बारामती शहरातून संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याने सोमवारी (दि. १९) सणसरच्या दिशेने प्रस्थान ठेवले. यावेळी नगर परिषदेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ‘टीम वर्क’ करीत अवघ्या तीन तासांत बारामती शहर ‘क्लीन केले. चकाचक बारामती नागरिकांच्या कौतुकाचा विषय ठरला.

पालखीचे प्रस्थान ठेवल्यावर संपूर्ण बारामती शहरासह मोतीबाग विसाव्यापर्यंत केवळ तीन तासांतच स्वच्छता मोहीम पूर्ण करण्यात आली. यासाठी मुख्याधिकारी महेश रोकडे यांच्या संकल्पनेतून मोहीम राबविण्यात आली.

रोकडे यांच्याच मार्गदर्शनाखाली व आरोग्य निरीक्षक राजेंद्र सोनवणे, अजय लालबिगे यांच्यासह मुकादम बळवंत झुंज, रणजित अहिवळे, निखिल शीलवंत, दादा घोलप यांनी परिश्रम घेतले. आरोग्य विभागाच्या व एन.डी.के. कंपनीचे सुपरवायझर उमेश जाधव, सचिन सोनवणे, अभिजित शेंबडे यांच्यासह सुपरवायझर महिला कर्मचारी यांच्याकडून बारामती चकाचक करण्यात आली. यासाठी ४ मोठी वाहने, ट्रॅक्टर, ४०७ वाहनासह ११ घंटागाड्या कचरा उचलण्यासाठी व्यवस्था करण्यात आली होती.

शून्य कचरा मोहीम यशस्वी
शहरात पालखी सोहळ्यासाठी २ लाखांपेक्षा जास्त वारकरी, तसेच एक लाखांपेक्षा जास्त नागरिकांनी पालखी सोहळ्यासाठी गर्दी केली होती. त्यामुळे शहराच्या अनेक भागांत, रस्त्यावर कचरा साठला होता. मात्र, पालखी पुढे जात असतानाच मागे टाकलेला कचरा तातडीने उचलण्याची दक्षता घेण्यात आली. शिवाय कचरा रस्त्यावर न टाकता तो कचराकुंडीतच टाकण्यासाठी स्वतंत्र नियोजन केले होते. त्यामुळे शून्य कचरा मोहीम यशस्वी करण्यास मदत झाली.