१० वर्षांनी सजला गुरूपूजन आणि शालेय जीवनातील आठवणींचा मनोहारी सोहळा.

कागदाची नाव होती…
पाण्याचा किनारा होता…
मित्रांचा सहारा होता…
खेळण्याची मस्ती होती…
मन हे वेडे होते…
कल्पनेच्या दुनियेत जगत होतो…
कुठे आलो या समजदारीच्या जगात…
यापेक्षा ते बालपणच सुंदर होते…
अशा प्रकारच्या कवितेचे सूर आळवत प्रत्येकजण आपल्या मित्रमैत्रिणींजवळ तब्बल १० वर्षे मनात साठवून ठेवलेल्या शालेय जीवनातील आठवणींना मनसोक्त गप्पांच्या माध्यमातून मोकळी वाट करून देत होता.
निमित्त होते मोई ता.खेड जि. पुणे येथील जि.प.प्रा.शाळा व इंदिराजी माध्यमिक विद्यालय या दोन्ही शाळांमध्ये इ ७वी आणि नंतर इ.१० मध्ये सन २००७-०८ व २०१२-१३ या वर्षी शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांनी हाॅटेल कृष्णा चिखली याठिकाणी आयोजित केलेल्या माजी विद्यार्थी स्नेहबंधमेळाव्याचे…अर्थात “एक दिवसाच्या शाळेचे”…
अगदी सकाळपासूनच सर्वजण शाळेत असताना अनुभवलेला प्रत्येक क्षण आठवणींच्या रूपाने जगत होता.कार्यक्रमाच्या आरंभी गुरूजनांवर केलेल्या पुष्पवृष्टीच्या माध्यमातून त्यांच्याप्रती असणारी निरंतर आदरभावना व्यक्त करत सर्व गुरूजन आणि विद्यार्थीमित्रांच्या औक्षणाने पूजन तसेच मनाला प्रसन्न करणाऱ्या प्रार्थनेने वातावरण अगदीच भाऊक झाले होते.त्यानंतर प्रत्येकजण गुरूजनांची तसेच एकमेकांची आस्थेवाईकपणे चौकशी करत मित्रमैत्रिणींना एवढ्या वर्षांनी भेटल्याचा आनंद साजरा करत होता.स्नेहमेळाव्याकरिता विशेष अतिथी म्हणून प्राथमिक शाळेचे निवृत्त मुख्याध्यापक आदरणीय गुरूवर्य श्री.राजेंद्र कांबळे सर तसेच माध्यमिक शाळेचे विद्यमान मुख्याध्यापक आदरणीय गुरूवर्य श्री.नवनाथ तोत्रे सर उपस्थित होते. उपस्थित माजी विद्यार्थी-विद्यार्थीनींच्या वतीने पुणेरी पगडी,शाल,श्रीफळ आणि भक्ती शक्तीची मूर्ती देऊन दोन्ही गुरूवर्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.”जे करायचं ते प्रामाणिकपणे करायचं..कारण कष्टाला पर्याय नसतो..तसेच समाजॠणातून उतराई होण्याकरिता आपलं शिक्षण कामी आलं पाहिजे…म्हणून सकारात्मक विचारांनी जीवनाची वाटचाल करत रहा तसेच सगळ्यात महत्वाचे म्हणजे एक चांगला माणूस बना” …असा मौलिक संदेश तोत्रे सरांनी सर्वांना दिला….माझा प्रत्येक विद्यार्थी यशस्वी आणि सर्वार्थाने मोठा झाल्याचा आनंद अष्टपैलू व्यक्तीमत्व असणाऱ्या कांबळे सरांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता.आजच्या स्नेहमेळाव्यातील स्वागताने आम्ही दोघेही गुरू भरून पावल्याचे सरांनी बोलून दाखविले.मसालेभात आम्ही नाही खात…या गाण्याची आठवण सांगताना पुन्हा एकदा शालेय जीवनातील अविस्मरणीय आठवणींची सफर घडवून आणत सरांना लहान झाल्यासारखे वाटत होते.स्नेहभोजनासमवेत शालेय जीवनात केलेल्या सर्व गमतीजमतींचा मनमुराद आनंद मनोगतातून व्यक्त करत अतूट मैत्रीचे गंमतीशीर किस्से ऐकताना वेळ कधी पुढे सरकली समजलंच नाही.दुपारच्या सत्रात विद्यार्थी मनोगताबरोबर वेगवेगळ्या खेळाचा आनंद घेत तरूणाईला थिरकायला लावणाऱ्या गाण्यांवर सर्व मित्रमैत्रिणींची पावले अलगद ताल धरू लागली होती.स्नेहमेळावा यशस्वी करण्यासाठी सर्व मित्रमैत्रिणींनी विशेष योगदान दिले.स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने दिवसभरातील आठवणींचा लेखाजोखा मनोगताच्या रूपातून व्यक्त करताना..किती सांगू मी सांगू कुणाला आज आनंदी आनंद झाला अशी भावना जपत प्रत्येकजण गहिवरला होता.वैयक्तिक आणि सामाजिक आघाड्यांवर यशस्वी वाटचाल करत असणाऱ्या आपल्या मित्रमैत्रिणींबद्दलचा सार्थ अभिमान प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत होता. स्नेहमेळाव्याच्या संस्मरणीय आठवणी मनात चिरंतन राहण्यासाठी उपस्थित सर्वांना आठवण म्हणून विठ्ठल-रुक्मिणीची तेजोमय मूर्ती भेट देण्यात आली.
उपस्थित सर्वांचे स्वागत तसेच स्नेहमेळाव्याचे सूत्रसंचालन…”मनातला आवाज” निवेदक श्री.संतोष एरंडे यांनी केले तर दिवसभराच्या रम्य आठवणी मनात साठवत जड अंतःकरणाने सर्वजण भविष्यातील स्वप्नांच्या वाटेवर जाण्याकरीता मार्गस्थ झाले.