बळीराजामध्ये भरली जातेय राजकीय हवा

राजगुरूनगर, दि. 29 खेड – कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक जाहीर झाली असून शेतकऱ्यांना यावेळी होणाऱ्या निवडणुकीत संधी मिळणार असल्याने काटे की टक्कर निर्माण होणार आहे. शेतकऱ्यांना संचालक होण्याची संधी पहिल्यांदाच मिळणार असल्या इतर राजकीय मंडळी पडद्याआडून त्यांना हवा भरत असल्याच्या चर्चा खेड तालुक्यात रंगल्या आहेत.राजगुरूनगर येथे बाजार समितीच्या मुख्य कार्यालयात सोमवारी (दि. २७) पासून निवडणुकीची तयारी पूर्ण झालीआहे. येत्या ३ एप्रिलपर्यंत म्हणजेच आठवड्याभरात तीन दिवस सुट्टी असल्यामुळे अवघे पाच दिवस नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचा अवधी असल्याने राजकीय कार्यकर्ते सरसावले आहे. दरम्यान, पुढील तीन-चार दिवसांत बाजार समितीच्या निवडणुकीत रंग भरणार असून अनेक दिग्गज राजकारणी व शेतकरी प्रतिनिधी त्यांचे उमेदवारी अर्ज दाखल करतील,अशी आशा आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सर्वसाधारण आणि महिला, अडते व्यापारी, हमाल मापडी मतदार संघ आहे. उमेदवारांना ५ हजार रुपये नामनिर्देशन पत्राबरोबर भरावे लागणार आहे. अनुसूचित, ओबीसी, अर्थिक दुर्बलसाठी १ हजार फी आहे. शेतकऱ्यांना संधी मिळणार असल्याने अधिक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात येणार असल्याने मतदानाची विभागणीतून आपल्याला फायदा कसा होईल याची राजकीय गणिते मांडण्याचा प्रयत्न केला जात आहे. बाजार समितीची निवडणूक लढण्यासाठी इच्छुक राजकीय पक्षातील पदाधिकाऱ्यांकडे चकरा मारु लागले आहेत त्यामुळे ओस पडलेली पक्षीय कार्यालये पुन्हा एकदा गजबजू लागली आहे.