इंदिराजी विद्यालय मोईत वीस वर्षांनी भरला माजी विद्यार्थी मेळावा

इंदिराजी माध्यमिक विद्यालय मोई ,तालुका -खेड, जिल्हा – पुणे या विद्यालयातील सन 2001 2002 या वर्षातील इयत्ता दहावीच्या बॅचचा माजी विद्यार्थी मेळावा आयोजित करण्यात आला होता . वीस वर्षांनी हे सर्व विद्यार्थी एकत्र आले . एकत्र आल्याचा आनंद आणि उत्साह प्रचंड जाणवत होता . भूतकाळातील आठवणींना उजाळा देत अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात हा माजी विद्यार्थी मेळावा संपन्न झाला .
विद्यालयाचे मुख्याध्यापक माननीय नवनाथ तोत्रे सर , श्री प्रताप गिरी सर ,श्री ज्ञानेश्वर कळसकर सर यांचा यावेळेस स्मृतीचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला . सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या शालेय जीवनातील आठवणी सांगितल्या .अनेक विद्यार्थी उद्योग व्यवसायामध्ये अग्रेसर असल्याचे दिसून आले .शाळेप्रती ,शिक्षकांप्रती असलेली कृतज्ञता सर्व माजी विद्यार्थ्यांच्या बोलण्यातून लक्षात येत होती .विशेषतः विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या .सर्वजण एकमेकाची चौकशी करत होते .सध्या काय करतो ? ती सध्या काय करते ?मुलं किती आहेत ? मुलं काय करतात ? अशा प्रश्नांची एकमेकाला चौकशी करत होते .
मुख्याध्यापक नवनाथ तोत्रे म्हणाले, ‘ बऱ्याच विद्यार्थ्यांचे नावे व चेहरे लक्षात आहेत ;परंतु काही मुली वीस वर्षांनी भेटत आहेत .वीस वर्षात जीवन खूप पुढे गेले आहे .जीवन जगताना चढ -उतार हे असतातच . त्यांना सकारात्मकतेने सामोरे गेले पाहिजे .नकारात्मक गोष्टी सोडून देऊन ‘ जीवनातील आनंद सातत्याने घेत राहिलं पाहिजे .भावी आयुष्यात खूप मोठं काम करा .देशाची गावाची सेवा करा . अशा प्रकारचे आशीर्वाद त्यांनी दिले .श्री प्रताप गिरी सर यांनी विद्यार्थी शाळेत असतानाच्या त्यांच्या गमती जमती बोलून दाखवल्या .शाळेच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र यावे असेही मत व्यक्त केले .श्री ज्ञानेश्वर कळस्कर सर म्हणाले , शाळेत असताना तुम्हाला आम्ही शिक्षा केली त्या पाठीमागे तुमच्या भल्याचाच विचार होता .आज तुम्ही जे काय आहात ते त्याकाळी तुम्हाला सकारात्मक शिक्षा केली त्यामुळेच तुम्ही आज शिस्तबद्ध जीवन जगत आहात .
हा मेळावा घडून आणण्यासाठी रवींद्र तुकाराम गवारे ,मोहन करपे ,सोमनाथ शिंदे ,मंगेश नामदेव गवारे (युवारत्न )मोनिका येळवंडे , मोनिका बिडकर यांनी खूप मेहनत घेतली व कार्यक्रम यशस्वी केला त्याबद्दल सर्वांनी त्यांना धन्यवाद दिले .
कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी स्नेहभोजनाचा आनंद घेतला .
सचिन तुकाराम गवारे यांनी सर्वांचे आभार मानले ;तर सूत्रसंचालन ज्ञानेश्वर उर्फ माऊली फलके यांनी केले .