एक गाव एक शिवजयंती मोई परिसरात उत्सव 

कुरुळी : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक युगपुरुष श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव मोईगाव (ता. खेड) येथे ग्रामस्थ, ग्रामपंचायत, गावातील सर्व मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, तरुणांनी एकत्र येत सलग चौथ्या वर्षी ‘एक गाव एक शिवजयंती’नुसार मोठ्या थाटामाटातसाजरा करण्यात आला.

यावेळी खासदार अमोल कोल्हे यांनी भेट देत सर्वांना शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या. मोई गावात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये किल्ले शिवनेरी ते मोईगाव शिवज्योत आणून गावात भव्य मिरवणूक काढण्यात आली. गावातील सर्व महिलांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव,पाळणा उत्सव, महिला भजनी मंडळाकडून भजनांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तसेच एक गाव एक शिवजयंती उत्सव कमिटी यांच्या प्रयत्नाने मोई गाव व परिसरातील गावांसाठी श्रीसंत तुकाराम महाराज वैकुंठस्थ लोकार्पण सोहळा पार पडला. श्री हॉस्पिटल यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. सर्व रक्तदात्यांना अमूल्य रक्तदान केल्याबद्दल आरोग्य किट व प्रशस्तिपत्र देण्यात आले. रक्तसंचलन पिंपरी सिरॉलॉजिकल इन्स्टिट्यूट ब्लड सेंटर पिंपरी पुणे यांनी केले. यावेळी मोई गावातील आजी-माजी सरपंच, उपसरपंच, सदस्य, सोसायटीचे पदाधिकारी, सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.