ज्येष्ठ निरुपणकार पद्मश्री डॉ. श्री. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्रभूषण पुरस्कार जाहीर

धर्माधिकारी यांच्यामुळे महाराष्ट्र भूषण पुरस्काराची उंची वाढली आहे अशा भावना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली. मुख्यमंत्री शिंदे पूढे म्हणाले, ज्येष्ठ निरुपणकार पद्मश्री डॉ. श्री. आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी बैठकांच्या माध्यमातून देशभरात व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा निर्मूलन, स्वच्छता, पर्यावरण संवर्धन यां सारख्या विविध क्षेत्रांत केलेले कार्य हे अनन्यसाधारण आहे. त्यांच्याकडूनच आम्ही सातत्याने प्रेरणा घेऊन कार्यरत असतो ही प्रेरणा काम करण्याची शक्ती देते. ज्येष्ठ समाजसेवक आणि निरूपणकार श्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांना वर्ष २०२२ चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात येणार असल्याचे बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले. महाराष्ट्र भूषण निवड समितीने केलेल्या शिफारशीवर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी शिक्कामोर्तब केले. १४ मे १९४६ रोजी पद्मश्री डॉ. दत्तात्रेय तथा आप्पासाहेब धर्माधिकारी यांचा रेवदंडा येथे जन्म झाला. आपले पिता डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्याकडूनच त्यांनी या सामाजिक व अध्यात्मिक कार्याचा वसा घेऊन गेली ५० वर्षे निरुपणाच्या माध्यमातून सामाजिक वैचारीक परिवर्तन घडवून समाजाला सद्विचारांचा वारसा दिला. लहानपणापासूनच बालमन सुसंस्कारीत झाले पाहीजे या हेतूने बालमनावर संस्कार करण्यासाठी त्यांनी विशेष बालसंस्कार बैठका सुरू केल्या तर आदिवासी वाडी, वस्त्यांवर व्यसनमुक्तीचे केलेले कार्य अनन्यसाधारण असेच ठरले आहे. डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे अनेक प्रकारचे सामाजिक उपक्रम राबविले जातात. अलीकडच्या काळात संस्थेने सर्वाधिक प्रमाणात वृक्षारोपण केले. त्याशिवाय वृक्षसंवर्धन, तलाव व स्वच्छता अभियान, रक्तदान आणि आरोग्य शिबिराचे आयोजनही नियमितरीत्या करण्यात येते. गणेशोत्सव व नवरात्रौत्सवनंतर निर्माल्यातून खतनिर्मिती करून एक पर्यावरणपूरक संदेशही त्यांनी समाजाला दिला आहे. डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी हे राज्याचे स्वच्छतादूत देखील आहेत. रायगड जिल्ह्यातील रेवदंडा येथे डॉ. आप्पासाहेबांचे प्राथमिक ते माध्यमिक शिक्षण त्यांनी पूर्ण केले. बालपणापासून त्यांना कीर्तन, भजन, अध्यात्मिक वाचन याची आवड होती. तळागाळातील प्रत्येक मनुष्यासाठी, समाजाच्या सेवेसाठी आप्पासाहेबांनी आपले पूर्ण आयुष्य वेचले आहे. या कार्याची सुरुवात त्यांचे वडील डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी ह्यांनी १९४३ सालापासून केली होती आणि आज तेच कार्य, तेवढ्याच जोमाने, तत्परतेने जगभर पोहोचविण्याचे कार्य डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी हे करित आहेत. डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहिर झाल्यावर देशपरदेशातील श्रीसदस्यांमध्ये आनंदाची मोठी लाटच पसरली असून ठिकठिकाणी आनंदोत्सवास प्रारंभ झाला आहे