आळंदीत कार्तिकी एकादशी निमित्त हरिजागर

ज्ञानाचा सागर, सखा माझा ज्ञानेश्वर या भावनेने राज्यभरातून आलेल्या असंख्य भाविकांमुळे अलंकापुरी भक्तिरसात न्हाऊन निघाली आहे. यंदा मात्र कार्तिकी यात्रेला भाविकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे
काल रात्रीपासूनच भाविकांची गर्दी वाढू लागल्यामुळे दर्शनमंडपातून येणारी दर्शनाची रांग कार्तिकी एकादशीचे औचित्य साधून माऊलींच्या संजीवन समाधीवर पवमान पूजेसाठी बंद ठेवण्यात आली. मध्यरात्रीच्या सुमारास स्वकाम सेवा मंडळाच्या सभासदांनी संपूर्ण देऊळवाडा धुवून स्वच्छ केला. घंटानाद झाल्यानंतर साडेबारा ते दोन वाजेपर्यंत संजीवन समाधीवर पवमान अभिषेक ११ ब्रम्हवृंद यांच्या हस्ते करण्यात आला
सनई चौघड्याच्या मंजुळ स्वराने मंदिरातील वातावरण मंगलमय झाले होते. मुख्य गाभारा आणि देऊळवाडा आकर्षक फुलांच्या सजावटीने दरवळला होता. माऊलींच्या समाधीवर चांदीचा मुखवटा ठेवून पंचामृत अभिषेक करण्यात आला. त्यासाठी दूध, दही, तूप, मध, साखर, आम्रखंड, सुगंधी तेल, उटणे, अत्तर यांचा वापर करण्यात आला. केशरी मेखला, शाल, तुळशीचा हार आणि डोईवर सोनेरी मुकुट ठेवून समाधीला आकर्षक रूप देण्यात आले. माऊलींच्या महापूजेला मानाचे वारकरी म्हणून अहमदनगर जिल्ह्यातील गोरक्षनाथ चौधरी (वय २९) छत्तीसगड सीआरपीएफ जवान आणि सविता चौधरी (वय २५) आयटी कर्मचारी हे दांपत्य पारनेर तालुक्यातील ढवळपुरी गावातील रहिवाशी आहेत
यावेळी दांपत्य म्हणाले आई वडिलांच्या पुण्याईमुळे आणि माऊलींची कृपा असल्याने असा योग्य घडून आला. सर्वांना सुखी ठेव असे मागणे त्यांनी माऊलींकडे मागितले. आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त योगेश देसाई, विश्वस्त विकास ढगे यांच्या हस्ते मानाचे वारकरी, मानकरी आणि निमंत्रित मान्यवरांना नारळप्रसाद देण्यात आला. यावेळी खेड तालुक्याचे आमदार दिलीपशेठ मोहिते पाटील, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह, प्रांताधिकारी विक्रांत चव्हाण, पालखी सोहळा मालक बाळासाहेब आरफळकर, व्यवस्थापक माऊली वीर, बाळासाहेब चोपदार, माऊलींचे मानकरी योगीराज कुन्हाडे
राहुल चिताळकर, स्वप्नील कुऱ्हाडे, योगेश आरु, आळंदी नगरपरिषद मुख्याधिकारी अंकुश जाधव, आळंदी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील गोडसे तसेच पदाधिकारी आळंदीकर ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते