वृक्षारोपण करून केले अस्थिकांचे विसर्जन पर्यावरण रक्षणासाठी बेंडाले कुटुंबीयांचा पुढाकार

निघोजे येथील (ता. खेड) निवृत्त ग्रामपंचायत कर्मचारी दत्तात्रेय शंकर बेंडाले यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या कुटुंबातील सदस्य आणि महाराष्ट्र राज्य पर्यावरण जागर प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने अस्थिका नदीपात्रात विसर्जित न करता शेतात पाच आंब्यांची रोपे लावली व त्याठिकाणी अस्थिका विसर्जित केल्या. कुटुंबातील पत्नी, तीन मुले मुलगी, नातू आणि पतवंडे यांनी नदीपात्रातील पाणी दूषित होऊ नये म्हणून अस्थिकांचे खत  म्हणून वापर केला.

बेंडाले यांनी निघोजे ग्रामपंचायतीमध्ये तुटपुंज्या पगारावर गावची पंचवीस वर्ष सेवा केली. ग्रामपंचायतमध्ये लिपिक ते पाणीपुरवठा कर्मचारी अशा विविध ठिकाणी काम करून ग्रामस्थांना सेवा केली. वृक्षारोपण कार्यक्रम प्रसंगी अरुणा बेंडाले नितीन बेंडाले, किरण बेंडाले, अविनाश बेंडाले, शकुंतला पवार, सुना, नातवंडे पतवंडे आप्तेष्ट परिवार उपस्थित होते. बेंडाले परिवाराने निसर्ग प्रेमापोटी अस्थिका विसर्जित न करता शेतात फळझाडे लावून वेगळा आदर्श निर्माण केला आहे..