ट्रेडींगमधील गुंतवणुकीच्या नावाखाली ३१ लाखांची फसवणूक; चिखली पोलिसांत गुन्हा दाखल

बँकेपेक्षा जास्त व्याजदर देण्याचे आमिष दाखवून ट्रेडिंगमध्ये गुंतवणुक करण्यास भाग पाडले. त्यानंतर गुंतवणूकदरांची ३१ लाख रुपयांची फसवणूक केली. पैसे परत मागितले असता जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी कंपनीच्या संचालकांवर चिखली पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे

अरुणोदय हरिदास चोरगे (रा. नेवाळे वस्ती, चिखली ) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार जाई स्टॉक ट्रेडिंग प्रा. ली. चे संचालक नितीन विश्वनाथ करळे (रा. कस्पटे वस्ती, वाकड), तुषार ज्ञानेश्वर शिवेकर, प्रवीण राठोड, एक महिला व इतर संचालकांवर गुन्हा दाखल झाला आहे. आरोपींनी फिर्यादी व साक्षीदार सुभाष निवृत्ती कोल्हे यांना त्यांच्या कंपनीच्या वेगवेगळ्या योजनेची माहिती दिली. कंपनीच्या ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास ही रक्कम फक्त ट्रेडिंग करिताच वापरली जाईल, गुंतवणूक केलेली रक्कम अन्य कारणासाठी वापरली जाणार नाही, या रकमेचे अग्रीमेंट लिहून देणार, बँकेपेक्षा जास्त व्याजदर दिला जातो, असे आमिष दाखविले.

फिर्यादी व कोल्हे यांनी आरोपींच्या सांगण्यानुसार कंपनीच्या ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केली. काही महिने नफ्याची व मुद्दलची रक्कम दिली. त्यानंतर रक्कम देण्यास टाळाटाळ केली. जाई स्टॉक ट्रेंडींगमध्ये जमा केली रक्कम ट्रेडिंगमध्ये जमा करावयाचे अॅग्रीमेंटमध्ये लिहून दिलेले असताना आरोपींनी या रकमेचा अन्य ठिकाणी विनियोग केला. फिर्यादी व साक्षीदार यांची ३१ लाख १ हजारांची फसवणूक केली. रक्कम परत मागण्याच्या कारणावरून जिवे ठार मारण्याची धमकी दिली. चिखली पोलिस अधिक तपास करीत आहेत.