राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन अनिश्चित काळासाठी पुढे ढकलले, ‘हे’ कारण येत आहे समोर

मुंबई : राज्यात नवीन सरकार (State Government) स्थापन झाल्यानंतर आता सर्वांना उत्सुकता लागलेली आहे ती मंत्रिमंडळ विस्ताराची (Cabinet Expansion), दरम्यान राज्य विधिमंडळाचे या अगोदर दोन दिवसीय विशेष अधिवेशन घेण्यात आले होते. यावेळी १८ जुलैपासून राज्यविधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाची (Monsoon Session) घोषणा करण्यात आली होती. परंतू आता 18 जुलैपासून सुरु होणारे विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आल्याची घोषणा विधिमंडळ प्रधान सचिव राजेंद्र भागवत यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे केली आहे.

दरम्यान १८ जुलै रोजी राष्ट्रपती (President) पदासाठी होणारी निवडणूक तसेच अद्यापही न झालेला राज्यमंत्रिमंडळाचा विस्तार इत्यादी कारणांमुळे पावसाळी अधिवेशन पुढे ढकलण्यात आल्याचे समजते, त्यामुळे सध्यातरी अधिवेशनाची पुढील नेमकी तारीख स्प्ष्ट नाही आहे. नव्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर लवकरच पावसाळी अधिवेशनाची तारीख घोषित होण्याचा अंदाज बांधण्यात येत आहे. जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अथवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात राज्य विधिमंडळाचे अधिवेशन बोलावले जाण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे.