मोईत इंद्रायणी पूल पाण्याखाली

कुरुळी, ता. १4 : खेड तालुक्याच्या दक्षिण भागातून वाहणाऱ्या इंद्रायणी नदीचा चिखली- मोई पूल पाण्याखाली गेला आहे. गेल्या सहा दिवसापासून मावळ तालुक्यात संततधार मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असल्याने मोई व परिसरातील गावच्या स्मशानभूमी पाण्याखाली गेली आहेत.

संततधार पावसामुळे मावळ तालुक्यातील इंद्रायणी नदीतील पाणी वाढल्याने मोई, कुरुळी आणि चाकण एमआयडीसी (महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन) यांना पिंपरी-चिंचवडसह जोडणारा मोई-चिखली पूल दोन दिवसांपासून पाण्याखाली गेला असून वाहतूक बंद आहे. खेड तालुक्याच्या दक्षिण भागातही नदीला पूर आला आहे.

इंद्रायणी खोऱ्याजवळील मोशी, मोई आणि कुरुळी येथील स्मशानभूमी आणि स्थानिक ग्रामपंचायतींना पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरी पाण्याखाली गेल्याचे नागरी अधिकाऱ्यांनी सांगितले. इंद्रायणी नदी दुथडी भरून वाहत असून धोक्याची पातळी गाठल्याने प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. इंद्रायणी नदीवरील बंधारेही बुडाले आहेत.

म्हांळुगे पोलीस चौकीच्या वतीने बंदोबस्त ठेवून हा पूल वाहतुकीस बंद करण्यात आला आहे. खेड तालुक्यातील मोई गावाचा पिंपरी-चिंचवड शहराशी पूल बंद झाल्याने संपर्क तुटला आहे.