गोकुळाष्टमीनिमित्त जपला सामाजिक सलोखा जातीपाती बाजूला सारत सप्ताहात योगदान; १७ हजार भाविकांना महाप्रसाद

आळंदी : पुढारी वृत्तसेवा

चाकण, खेड एमआयडीसी, पिंपरी-चिंचवड शहरानजीक झपाट्याने विकास होत असलेल्या गावांमध्ये आधुनिकतेच्या लाटेतदेखील आपले गावपण जपून ठेवत गेले ३० वर्षांपासून चालत आलेला गावचा भगवान श्रीकृष्ण जन्माष्टमी अखंड हरिनाम सप्ताह, चिंबळी (ता. खेड) ग्रामस्थांनी आजतागायत अखंडपणे सुरू ठेवला आहे. विशेष म्हणजे गावात असलेल्या विविध जातीधर्माचे लोक यानिमित्ताने एकत्र येत सामाजिक सलोखा जपताना दिसून येत आहेत.

आठ दिवस सप्ताहात हजारो भाविकांनी हजेरी लावली. मोठ्या प्रमाणात लोकसंख्या विस्तार झालेल्या आणि बाहेर राज्य व जिल्ह्यातील नागरिक, भाडेकरूंची संख्या सर्वाधिक असलेल्या ठिकाणी दररोज पंचपक्क्वान जेवण, महाप्रसाद वाटप करणे तसे सहज शक्य नाही. मात्र, गावची परंपरा जपत गावाच्या सर्वच आडनावाच्या, जातीच्या भावक्या एकत्र आल्या आणि त्यांनी हे शिवधनुष्य पेलत तब्बल आठ दिवस जवळपास १६ ते १७ हजार भाविकांचा महाप्रसाद स्वखर्चाने उपलब्ध करून दिला हे विशेष असेच आहे.

आठ दिवस गोकुळाष्टमी सप्ताहानिमित्त राज्यातील नामवंत कीर्तनकरांची कीर्तनसेवा पार पडली.कीर्तनकारांबरोबरच नामवंत गायक परमेश्वर महाराज वरखड, बंडोपंत खामकर, मृदंगमणी व्यंकटेश महाराज फड, बळीराम खरात आदींचे सहकार्य लाभले. या सप्ताहाचे नियोजन समस्त ग्रामस्थ, श्री काळभैरवनाथ यात्रा कमिटीच्या वतीने करण्यात आले होते. सप्ताहात निकिता व अवंतिका बहिरट यांचा अभंगवाणी कार्यक्रम पार पडला. गावातील जैद पाटील, बनकर पाटील, बर्गे, बहिरट, कातोरे, कड, चव्हाण लोखंडे, अवघडे, जाधव, जगनाडे, जाधवमळा, बटवाल, बारमुख, पाटोळे, सोनवणे, फुलवरे, भुमकर, खंडागळे, उंबरकर, पाटारे, सातव, शेलार, चोरामले, काळोखे, महांगरे, घुले, व्यवहारे, विधाटे, कहाणे, शिंदे, बोरावके, मानकर, परदेशी, कुदळे, झोडगे, गजेसिंह, सायकर, म्हाळसकर, शिळवणे, थोरवे, कापसे, जाधव, नाईक, गवळी, पिरंगुटे, नेहरे, रेणुसे आदी यात सहभागी झाले होते.

एकंदरीतच जाती-धर्छ भेदाभेद बाजूला सारत गावकी-भावकीच्या राजकारणाला फाटा देत चिंबळीकरांनी जपलेली ३० वर्षांची श्रीकृष्ण जन्माष्टमी सप्ताहाची परंपरा पंचक्रोशीत कौतुकाचा विषय ठरत आहे. संपूर्ण गावच यानिमित्ताने एका छताखाली आणण्याचे सामाजिक कार्य चिंबळीकरांनी केले आहे.